लेखक निमिष सोनार यांच्या अचाट कल्पनाशक्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. रहस्य, थरार, गती, धाडस, आव्हान, गूढत्व आणि अचाट कल्पनाशक्ती यांचे मिश्रण "डिटेक्टिव्ह निगेटिव्ह" या कादंबरीत दिसून येते. मनुष्य स्वत:चा मेंदू जेमतेम १०% च वापरतो, असे म्हणतात की जर त्याने २०-२२% मेंदूचा वापर केला तरी अनेक अचाट गोष्टी तो करु शकतो.
मनुष्याने मेंदूचा किती भाग वापरला आणि कोणता भाग वापरला तर किती प्रमाणात आणि काय प्रकार तो करु शकेल याची कल्पना करणे अशक्यच आहे. या कादंबरीत आहे तश्या प्रकारच्या एखाद्या पात्राचीसुद्धा कल्पना करणे मनुष्यास अवघड जाते पण लेखकाने एकाहून एक अशी कित्येक पात्रे या कथेत एकत्र आणून एक शिवधनुष्यच पेलले आहे आणि नुसते पेलले नसून त्यावरुन मंत्रमुग्ध करणाऱ्या घटनांचे बाण चालवून वाचकांना मोहित केले आहे.
वैज्ञानिक संकल्पना, शोध, विविध पात्रे आणि सुपर पॉवर्स एकमेकात दुध-साखर आणि केशर यांच्याप्रमाणे मिसळून गेले आहेत आणि एक अप्रतिम मिष्टान्न या निमित्ताने मराठी साहित्यात अवतीर्ण झाले आहे.
निमिष सोनार यांनी अशक्य वाटणाऱ्या अशा अनेक शक्यतांची कल्पना करत त्या कल्पनासुमनांचा उत्कृष्ट पुष्पगुच्छ बनवला आहे. वैज्ञानिक संकल्पनांच्या झऱ्यासोबत शृंगाररसाची कारंजीदेखील तितक्याच आकर्षकतेने नटवलेली आहेत. सामान्य माणसाच्या जीवनातील दैनंदिन घडामोडी आणि सुपरहिरोंच्या आयुष्यातील घटना अगदी सहजतेने आणि लीलया रंगवल्या आहेत.
मराठीत मुळातच विज्ञान कथा कमी लिहिल्या जातात त्यामुळे मराठीत विज्ञानकथा म्हंटल्यावर एक कुतुहल जागृत होतेच, त्यात निमिष सोनार यांनी ही कथा ज्याप्रकारे विविध रंगांनी रंगवली आहे ते मनास भारावून टाकते. लेखकाने विविध कल्पनांची सुत्रबध्द गुंफण करुन वेगवान घटनांची जी कथारुपी साखळी निर्माण केली आहे ती वाचकांना खिळवून ठेवेल यात शंका नाहीच. लेखकाला केवळ विज्ञानच नव्हे तर इतरही अनेक विषयांत उत्तम गती आहे, त्यांच्या कल्पनाशक्तीतील उत्तुंगता लपून राहू शकत नाही. त्यांच्या लेखनात प्रज्ञा आणि प्रगल्भता यांचा सुवर्ण संगम दिसून येतो.
श्री निमिष सोनार यांच्याकडून अश्या अनेक रंजक कथा आम्हाला वाचायला मिळतील अशी मला खात्री आहे, त्यांच्या पुढील वाटचालीस खुप खुप शूभेच्छा!!
- आदित्य भागवत, ठाणे (वास्तू ज्योतिष सल्लागार) (मो: 9029581590)
***
ESTÁS LEYENDO
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Ciencia Ficciónहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!