नेटवर्किता सांगू लागली, "आमच्या व्हायरसिक सरांनी नुकतेच जगभर विविध क्षेत्रांतील कंपनीतून वेगवेगळ्या कारणास्तव कामावरून काढून टाकलेल्या जवळपास तीन लाख कर्मचाऱ्यापैकी पन्नास हजार जणांना सोशल मिडीयाच्या माध्यमांतून डमी अकाऊन्ट बनवून संपर्क साधला आणि आमच्या टीममध्ये काम दिले. त्यांना आधी होता तितकाच पगार आम्ही देणे सुरु केले आणि ते जिथे आहेत तिथेच राहून आमच्यासाठी काम करू लागले. ते असे लोक होते ज्यांना जॉब गेल्यानंतर नंतर पुढे कुठेच नोकरी मिळाली नव्हती आणि ते व्यवसायसुद्धा सुरु करू शकत नव्हते त्यामुळे स्वत:चा आणि कुटुंबाचा आत्मघात करायला निघाले होते."
आता स्क्रीनवर लाल रंगाचा एक व्यक्ती आणि त्याच्या अवतीभोवती काळ्या रंगाचे इतर व्यक्ती दिसत होते. ते एक प्रतिकात्मक चित्र होते ज्यात त्या लाल मानवाकृतीने इतर आकृत्यांना जणू शरण दिली होती.
"शास्त्रज्ञ, डॉक्टर, संशोधक आणि इतर असे सर्व लोक जे जगभर अन्यायकारक पद्धतीने लोकांचे व्यवसाय किंवा नोकऱ्या नष्ट करण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरत आहेत त्या सर्वांना आम्ही आता नष्ट करणार आहोत कारण आता टीम मध्ये जास्त लोक जॉईन झालेत!"
"आमच्या सरांना पृथ्वीवरच्या या सर्व ठराविक सजीव निर्जीव गोष्टी नष्ट करून दुसरीकडे एक प्रतिसृष्टी उभारायची आहे, ज्यात निसर्गाशी आत्मीयतेने वागणारी माणसे आणि प्राणी असतील. सरांचेच सगळे ऐकणारी सजीव सृष्टी तिथे असेल. आम्ही भग्न करत असेलल्या इमारती, वास्तू बघून निसर्गावर अतिक्रमण केल्याची आणि विज्ञानाच्या नादात मानवतेचा पैलू विसरल्याची तुम्हाला सतत आठवण येत राहील. शास्त्रज्ञ, डॉक्टर, संशोधक यांनी लावलेले सगळे शोध आम्ही नष्ट करून, काहींना गायब करून आमच्या सोबत आमच्या प्रतिसृष्टीत नेऊ तर काहीना आम्ही इथेच जीवे मारू. ज्यांना प्रतिसृष्टीत नेऊ तेथे त्यांना पूर्ववत करू आणि त्यानंतर ते आमच्या सरांचेच ऐकतील आणि त्यांचे दास होतील! आणि हे सगळे आम्ही तुमचेच संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान वापरून करणार आहोत. जसे आम्ही सुजित लहाने याने बनवलेले हवेपासून अतिशुद्ध एक लिटर पिण्याचे पाणी आणि एक लिटर पेट्रोल बनवणारे मशीन चोरून पाण्याची तहान कायम भागवत आहोत आणि पेट्रोल विकून पैसा उभारत आहोत. पेट्रोल स्वतःसाठीसुद्धा वापरत आहोत. तसेच ताकामिशी क्योदाई यांचे क्रांतिकारक अदृश्य स्क्रीन आणि रोबोट आमच्याकडे आता पाणी भरत आहेत. असे अनेक क्रांतिकारक शोध जगापुढे येण्याआधीच आम्ही हायजॅक केले. आमच्याकडे काम करणारे नोकरी गमावलेले कुशल तंत्रज्ञच आणि डॉक्टर्स आता त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला शह देण्यासाठी करत आहेत. आमच्याकडे जगातील सर्वात कुशल हॅकर्स आहेत. तेच आमच्यासाठी सायबर गुन्हे करून तुमच्या सारख्या अपराधी लोकांच्या अकाउंटमधून पैसे ऑनलाईन चोरून आमच्या अकाऊंटमध्ये टाकत आहेत. तेच हॅकर्स 'वाईट लोक येतील..' हा एस एम एस सर्वांना पाठवत आहेत आणि तुमची आयटी डिपार्टमेंट अजूनही शोध लावू शकली नाही की हे एस एम एस येतात कोणत्या सर्व्हर वरून?? लोहा लोहे को काटता है यानुसार आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आमचे ध्येय साध्य करणार!"
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!