आता सर्वजण डेकवरील एका शेड खाली जमले होते.
नेत्रा बोलू लागली, "ओशन सिकनेस ज्यांना आहे किंवा जे जहाजावर प्रथम प्रवास करत आहेत आणि ज्यांना माहिती नाही की आपल्याला हा सिकनेस आहे की नाही त्यांचेसाठी आपल्या जहाजावर डॉक्टर्स उपलब्ध आहेत, काही त्रास झाल्यास त्यांना सांगावे. मूळ मुद्द्यावर येऊन सांगायचे झाल्यास सायन्स फेस्टीव्हल मधल्या सहभागी विद्यार्थ्यांच्या गाड्यांवर पुलावर जो हल्ला झाला त्यातून आधी काही ठोस पुरावे मिळाले नव्हते पण आता तुमच्यावर जो यांत्रिक सापांद्वारे हल्ला झाला त्यातील यांत्रिक सापांचे तुकडे आणि पुलावर मिळालेले यांत्रिक तुकडे आणि रणजित यांच्या गाडीच्या स्फोटात सापडलेले अवशेष हे सारख्याच प्रकारचे आहेत, हे सिद्ध झाले आहे! आमचा संशय खरा ठरला आहे! मती चक्रावून गेल्यासारखे वाटते आहे. जयवंत जसकर यांच्या नुकत्याच मला आलेल्या मेसेजने हे आताच सिद्ध झाले आहे."
"ओह, सगळंच अनाकलनीय, अद्भुत आणि अनपेक्षित आहे!", हाडवैरी म्हणाला.
"हो ना! कमी खर्चात ते लोक पेट्रोल डिझेल बनवून स्वतःच्या संस्थेच्या काळया कारवाया तडीस नेत आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपये वाचले आहेत. आता पाठलाग करणारी ती गाडीसुद्धा स्वस्तातलं पेट्रोल वापरत होती हे नक्की. त्या सुजित लहाने याने बनवलेल्या प्रोजेक्टचे मशीन चोरून त्यांनी हे सगळं केलं. आमच्या अंदाजानुसार पाण्याखालून एखाद्या पाणबुडी मधून, तुमच्यावर हल्ला करणाऱ्या सापांसारखेच एखादे यांत्रिक प्राणी पुलावरच्या गाडी खाली आणून, कुणीतरी जवळपास असलेल्या एखाद्या जहाजावरून रिमोटने त्यांचा कंट्रोल करून सुजित लहानेच्या गाडीचा स्फोट करवला असावा आणि ते मशीन पाण्याखालून पाणबुडीतून चोरून गुप्तरितीने त्यांच्या एखाद्या जहाजावर नेऊन मग त्यांच्या ठिकाणी पळवले! मला आपल्याच एका टोपीवाल्या माणसाने त्या दिवशी ही बातमी बघून फोन केला पण त्या वेळेस मी ऑपरेशन करत होते, कालांतराने मी त्याचा फोन उचलला. सायन्स फेस्टिवलचा तो दिवस आमच्यासाठी कलाटणी देणारा ठरला. त्या दिवसापर्यंत आपली संस्था आकारास येत होती. दरम्यान समुद्रातील एका ठिकाणाचा शोध आपल्या संस्थेतील वैज्ञानिकांना लागला होता. मग आपल्या या संस्थेने हालचाली अधिक गतिमान करायच्या ठरवल्या. आपल्या संस्थेत वैज्ञानिक आणि डॉक्टर्स यांची कमी नव्हती पण तुमच्यासारख्या सुपर पॉवर असलेल्या लोकांची सुद्धा अधिकाधिक गरज भासू लागली. लहानपणी सुनिलच्या विशेष डोळ्यांबद्दल आम्हाला कळले तेव्हाच मी त्याबद्दल अधिक संशोधन सुरु केले आणि अशा विशेष शक्ती असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत घ्यायचे हे ठरवले. माझे वडील आर्मीत होते. मी सुद्धा आर्मीत काही वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे देशासाठी काहीतरी करायचे संस्कार आमच्या कुटुंबात आधीपासून आहेत. मग मी माझ्या काही माणसांना सुनिलच्या मागावर पाठवले. सुनिलच्या घरच्यांशी तसे उघडपणे बोलता येणार नव्हते कारण या पद्धतीच्या कामात जीवाला धोका असतो त्यामुळे त्यांनी नाही म्हणण्याची शक्यता जास्त होती तसेच त्यांना सुनिलच्या या सुपर पॉवर बद्दल सांगणे पण योग्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सुनिलवर बंधने घातली असती. आता घडून गेल्यावर त्यांना कळले जरी तरी काही हरकत नाही पण आधी कळणे योग्य नव्हते. म्हणून आम्ही छुप्या पद्धतीने आमचे काम सुरु ठेवले. तुमची पॉवर नेमकी कशी आहे, आपल्या संस्थेच्या कामास उपयोगी ठरेल का हे आम्ही शोधत राहिलो.अजून सुनिल मोठा होईपर्यंत त्याला संस्थेत घेता येणार नव्हते. तोपर्यंत आपल्या संस्थेशी सलग्न असलेल्या पोलिसांना म्हणजे रणजित यांना योगायोगाने तुझ्या शक्तीबद्दल कळले. मग त्यांच्याबरोबर काम करून असाही तू अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करतच होतास. रणजित यांनी आम्हाला हे ही सांगितले होते की सुनिलने त्याच्या घरच्यांना त्याच्या सुपर पॉवरबद्दल सांगितले नाही आहे. आम्हालाही हेच हवे होते. पण दुर्भाग्याने पुढे रणजित यांच्या गाडीचा स्फोट झाला. ते शहिद झाले. अशाच कसल्यातरी रिमोटने ऑपरेट होणाऱ्या यांत्रिक प्राण्यांच्या मदतीने त्यांनी तो स्फोट केला असावा. नरीमन पॉईंट जवळच्या एखाद्या इमारतीतून त्यांच्या एखाद्या माणसाने ते रिमोटने कंट्रोल केले असावे! स्फोटानंतर तिथे सापडलेले तुकडे पण त्या सापांच्या तुकड्यांसारखेच आहेत. आपले दुर्भाग्य की आपण रणजित यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला."
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!