9. पहिले प्रेम

67 0 0
                                    

अतिशय कच्ची स्मरणशक्ती असलेला व्यक्तीसुद्धा आपले आयुष्यातील पाहिले प्रेम विसरू शकत नाही तर मग सायली तर अद्वितीय स्मरणशक्ती लाभलेली मुलगी होती आणि पहिल्या प्रेमाची गोष्टच वेगळी असते. प्रेम ही जगातील सर्वात पवित्र आणि हवीहवीशी वाटणारी भावना! आपण कुणालातरी आवडतो किंवा आपल्याला कुणीतरी आवडतं आणि हवंहवंसं वाटतं, कुणाचातरी सहवास हवासा वाटतो ही मखमली भावनाच आपल्या हृदयावर कोमल फुलपाखरू फिरवते आणि आवडती व्यक्ती समोर आली तरी हृदयाची धडधड वाढवते. आवडत्या व्यक्तीशी बोलतांना मनावर मोरपीस फिरत राहातं.

असंच एक मोरपीस एमबीबीएसला असतांना सायलीच्या मनावर फिरत राहून तिला गुदगुल्या करायचं, जेव्हा ती सोबतच्या डॉक्टर सूर्यप्रताप मल्होत्रा सोबत बोलायची. त्याच्या बोलण्याच्या आकर्षक पद्धतीवर ती भाळली! त्याची केसांची विशिष्ट स्टाईल, आवाजातला भारदस्तपणा, नियमित व्यायामाने कमावलेले एखाद्या बॉलिवूड हिरोप्रमाणे भासणारे शरीर, त्याची अभ्यासातली हुशारी या सगळ्या गोष्टींमुळे ती त्याच्या प्रेमात पडली होती!

कॉलेजमधील सहा सात मुली त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायच्या. त्या सर्वजणींनी धिटाईने सूर्यप्रतापसोबत झटपट मैत्री करून टाकली होती. पण एकीचीही अजून त्याला प्रपोज वगैरे करण्यापर्यंत मजल गेली नव्हती. त्या सर्वजणींना हे माहिती होते की त्याची कुणीही अजून एकमेव पक्की गर्लफ्रेंड नव्हती. पण खरे काय ते फक्त सूर्यप्रतापलाच माहिती होते. पण सायलीची मात्र जुजबी अभ्यासातील गोष्टी त्याच्यासोबत बोलण्याव्यतिरिक्त त्याच्याशी अवांतर मैत्री करण्याची हिम्मत होत नव्हती. इतर अनेक मुलांशी ती अतिशय मोकळेपणाने बोलू शकायची पण हा समोर आला की तिच्या छातीत धडधड व्हायला लागायची, काय बोलावे तेच सुचेनासे व्हायचे. सहज काहीतरी विषय काढून तरी त्याच्याशी बोलावे असे ती ठरवून त्याच्याकडे जायची पण जुजबी बोलून कसेतरी हसून फजिती होऊन तिथून काढता पाय घ्यायची.

पण एकदा त्याला कॉलेज कँटीनमध्ये एका टेबलावर एकटा गाठून तिने सुरुवात केलीच. त्याला इंग्रजी, हिंदी आणि थोडे मराठीपण येत होते. ह्युमन ऍनाटॉमी बद्दल ते बराच वेळ बोलत बसले, तिने सगळं येत असूनही त्याला बऱ्याच शंका विचारल्या आणि त्याने दिलेल्या उत्तरांचा दर्जा पाहून ती आणखीनच त्याच्या प्रेमात पडली. मेडिकल अभ्यासक्रमातले खूप लांबलचक स्पेलिंग त्याला सहज लक्षात राहत होते, आणि विशेष म्हणजे त्याला सायली सारखी अनंत हस्ते मुबलक मिळालेली स्मरणशक्ती सुद्धा लाभलेली नव्हती. त्यालाही तिच्याशी त्याच दिवशी पहिल्यांदा एवढ्या मोकळेपणाने बोलून तिच्याबद्दल जाणून घेता आले.

डिटेक्टिव्ह निगेटिव्हNơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ