#नाती_जपतांना - कथा २७

8 1 0
                                    

उतारवयात यशोदाबाईंच्या नशिबी, चार मुलांच्या घरी प्रत्येकी तीन महिने या पध्दतीने फिरता प्रवास सुरू झाला. त्यांना हो, असे म्हणण्या शिवाय काही पर्याय ही नव्हता. 

अर्थात त्यासाठी जबाबदार थोड्या बहुत प्रमाणात त्या स्वतः च होत्या. सगळं घर स्वतःच्या जीवावर उभं केलं त्याचीच परिणती म्हणजे त्यांचा स्वभाव करारी, व जुळवून न घेण्याचा झाला होता. कोणत्याही सूनेशी आधि कधी पटवून घेतले नाही, आपलीच काय ती शिस्त, नि बाणा... (चूक बरोबर असे काही नसते, असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी...‌)


आता नव्वदीच्या आईला मुलांनी स्पष्टपणे सांगितले, या पुढे आम्ही सांगतो ते ऐक. एकटी न राहता आमच्या घरी चल, आम्ही सगळे आनंदाने करु. कोणा एकावर भार नको, म्हणून आम्हा चौघा भावांकडे मिळून राहा. (मुलं त्यांच्याजागी बरोबर होती, साठी मध्ये आलेल्या आपापल्या बायकांकडून तरी किती अपेक्षा करणार!!) वसुधा, दुसरी सून, सारं काही शांतपणे ऐकत, बघत होती, सासूबाईंच्या डोळ्यातील हतबलता तिने स्पष्टपणे टिपली होती..


ठरल्याप्रमाणे मोठ्या मुलाकडे तीन महिने राहून यशोदाबाई वसुधेकडे आल्या. इथला पहिला महिना काहिसा रुटिन जमवण्यात गेला. वसुधेने लहान बाळ झालेल्या आपल्या सासूबाईंच्या आवडीनिवडी, दैनंदिन रुटिन बरोबर समजून घेतले. नि त्यानुसार स्वतःचेही रुटिन थोडं बदलले.. (वयानुसार आता यशोदाबाई सुध्दा स्वभावाने बदलल्या होत्या!) तीन महिने संपताना दोघींनाही एकमेकींची सवय झाली.


वसुधेने सर्वांनाच समजावले, असे तीन तीन महिने नियमाने न करता सासूबाईंच्या इच्छेनुसार करुया. या वयात त्यांची अशी ससेहोलपट नको,. नि सर्वांना हा विचार पटला ही... वसुधेने प्रेमाने आपल्या त्याच कडक शिस्तीच्या पण आता मृदू झालेल्या सासूला साद घातली नि त्यांनी ही मनापासुन हा नवा बदल स्वीकारला... 


(आता यशोदाबाई नि चार सूना एकत्रपणे ठरवतात) एकमेकांना समजून उमजून घेतल्याने जुनेच नातं नव्याने बहरत होते. समाप्त!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now