#नाती_जपतांना - कथा ३५

2 0 0
                                    

हे काय, श्री काका नाही आला का? आज तर तो यायलाच पाहिजे, आप्पांच्या वाढदिवसाला... तुम्हाला सांगतो, श्री काका म्हणजे आमच्या आप्पांच्या मनाचा आउटलेट, ५० वर्षांहून अधिक काळ एकत्र असलेले जीवश्र्च कंठश्र्च मित्र... एकवेळ घरात काही सांगणार नाहीत पण ह्या दोघांना एकमेकांचं सगळं काही माहिती असणार..


तसं तर दोघांचेही संसार यथासांग पार पडलेले, उन पाऊसाचे दिवस दोघांनाही माहितीचे... दोघांपैकी कोणीही फार काही पैसेवाला नाही पण मैत्री म्हटले की पैसे, स्टेटस, शो औफ ह्या गोष्टी कुंपणाच्या पलिकडे.. राहते ती फक्त मनाची श्रीमंती, जी मोजण्या पलिकडे असते..


बहुतेक वेळेस श्री काका आमच्या घरी यायचा, चहा पिताना गल्ली ते दिल्ली नि पृथ्वी ते अध्यात्म, असे एकूण एक विषय दोघांच्यात चर्चिले जायचे... दोघांनाही एकमेकांची मते पटायची नाहीत, शेवट मात्र कोणत्यातरी समसमान मुद्द्यावर व्हायचा.. (आमचा आपला छान टाईमपास व्हायचा या मध्ये...)


अजून कसा आला नाही म्हणून श्री काकाच्या घरी फोन केला तर समजले त्याला दम्याच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल केले आहे... औक्सिजन लावाला लागला आहे, हे ऐकताच एरवी बाहेर जाताना का-कू करणारे आप्पा तडक स्कुटर काढून निघाले... साहजिकच आम्ही पण... दवाखान्यात आप्पा आलेले पाहताच निम्मा त्रास कमी झाला होता श्री काकाचा..


तिथल्याच कैंटिन मधून वाटी केक मागवून आप्पांचा बर्थडे त्यांच्या या मित्रासमवेतच साजरा केला आज.. असा जीवाचा मित्र लाभणे, त्याची मैत्री आयुष्यभर जपणे, आनंदात व दुःखात एकत्र राहणे, हे आजकालच्या जगात आमच्या जनरेशनला थोडं कौतुकाचेच वाटायला लागले आहे... 


जग जवळ आले आहे खरे, पण आपली म्हणावीत अशी नाती कमी होत आहेत का हो? समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाDonde viven las historias. Descúbrelo ahora