#नाती_जपतांना - कथा ३०

4 0 0
                                    


आईsss, बाळू मामा आला आहे, असे ओरडतच मी दोन मजले पळत यायचो. आज राखीचा दिवस, काही झाले तरी कसं ही करुन सकाळी लवकर मामा येणार म्हणजे येणारच... आणि येताना आमच्या करता श्रीखंडाच्या गोळ्यांचा गोड खाऊ..‌ (त्याची मजा काही औरच!!)


तसा तर तो आईचा मावस भाऊ पण आई लग्न होऊन पुण्याला आली आणि पुढच्या वर्षी पासून नियमित, न चुकता, न विचारता, कोणतेही वेगळे प्लैनिंग न करता मामा व आईची राखी व भाऊबीज सुरू झाली. मामा तसा फारसा शिकलेला नव्हता, एका ब्रश बनवणाऱ्या कंपनी मध्ये कामाला होता. पण मनाने सच्चा, अगदी निस्वार्थी..


आमची आई सकाळीच लवकर उठून, स्वतःचे व आमचे आवरून, मामा येणार म्हणून वेगळा काही तरी नाश्ता करायची. गरमागरम नारळीभाताचा नैवेद्य देवाला दाखवून, सर्व प्रथम मामाला द्यायची.. आधीच गोंड्याची रंगीबेरंगी राखी आणलेली असायची... ओवाळणी ही ठरलेली ५-१०-२० रुपये असेल काहीशी, पण त्यातला आपलेपणा व निर्व्याज प्रेम हे अनमोल असायचे..


लग्न होऊन नव्या शहरात आल्यावर 'मी‌ आहे, काळजी करू नकोस', हे न बोलता पण आपल्या छोट्याश्या कृतीतून सांगणारा आमचा हा मामा आईचा विशेष लाडका होता.. नात्यांचे बंध हे व्यवहारा पलीकडे आत्मियतापूर्ण असतात हे च खरे... ना त्यांना कोणत्या औपचारिकतेची गरज ना कोणत्या मानमरातबाची.‌.. तुमचाही असा एखादा नात्यातला/मानलेला भाऊ / बहिण असेलच ना!! 


समाप्त!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now