#नाती_जपतांना - कथा १७

4 1 0
                                    


कित्ती सुंदर आहेत तुमच्या कडची ही सगळी जुनी तांब्या पितळेची भांडी... खूपच मस्त.. आजकाल तर हे बघायला सुध्दा मिळत नाहीत... इतका छान, कसा काय जपला हो हा ठेवा, वंदनाताई!!


(आणि मी माझ्याच विचारात २० वर्षे आधी गेले) खरे सांगू का, आमच्या आजेसासूबाईंच्या वेळची आहेत ही. माझं लग्न झालं तेव्हा सासूबाईंच्या अगदी दररोजच्या वापरातील होती ही भांडी. पण मला ती एवढीशी आवडत नव्हती त्या वेळी.. पुढे पुढे घरची माणसे हि कमी होत होती व त्यांचा वापर ही कमीच होत गेला..


आमच्या सासूबाई ८० च्या पुढे होत्या तेव्हा त्यांच्याच्याने फारसं होत नव्हते.. एकदा अगदी भावनिक होऊन मला म्हणाल्या वंदू, माझ्या सासूबाईंची हि आठवण तुझ्या हवाली करते हो.. शक्य होईल तेवढं त्यांना जप. खूप आठवणी आहेत त्यात... अगदी त्या वेळच्या ३०-४० जणांच्या साग्रसंगीत स्वयंपाकापासुन ते आत्ताच्या आपल्या घरच्या गणपती पर्यंत या पारंपरिक भांड्यांनी न जाणो कित्येकींच्या संसारात हातभार लावला आहे. आपल्या माणसांच्या मनात शिरताना व हे घर आपलेसे करताना या भांड्यांनीच तर साथ दिली होती..‌ त्यांना माझ्या नंतर पोरके करू नकोस हो...‌ एवढं एकच मागणं आहे गं माझं...


त्यांच्या डोळ्यात पाहताना मला राहवले नाही. मी पण अगदी मनापासुन सासूबाईंना हो म्हणाले व त्या दिवसापासून मला हि सगळी भांडी खऱ्या अर्थाने आपलीशी झाली... त्यांची स्वच्छता, वेळच्या वेळी करायची कल्हई कामे, त्यांची स्वयंपाकघरातील योग्य ती जागा हे सगळं अगदी नकळतच लक्ष देऊन होऊ लागले.. माझ्या सासूबाईंचा या रुपाने माझ्या पाठीशी भक्कम आधार आहे असंच वाटतं मला..‌


आपली संस्कृती, इतिहास, नात्यांचा सारीपाट व वारसा हा असाच पिढी दर पिढी पुढे जात असतो नाही... फक्त त्यांचं महत्त्व वेळच्या वेळी समजणं खूप महत्त्वाचे आहे. नव्याचा स्वीकार करताना जुन्याला ही जपावं.. बरोबर आहे ना! समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाOnde histórias criam vida. Descubra agora