#नाती_जपतांना - लघुकथा ३६

3 0 0
                                    

लता, उद्या अविधवा नवमी आहे. तुझ्या सासूबाईंकरताचे करायचे असेल ना! (लताची मावशी)


खरे सांगू का मावशी, मी माझ्या सासूबाईंना पाहिले पण नाही. मकरंद १६ वर्षाचा असताना आई गेल्या. त्याच्या मनात पण तेव्हाच्याच आठवणी आहेत. नुसता फोटो बघून मला माझ्या सासूबद्दल फार काही वाटतच नाही गं..‌. नवमीच्या दिवशी मी करते सगळं पण ... (एक मोठा उसासा)


मावशीला तसा थोडा धक्काच बसला होता. पण तसे न दाखवता, ती म्हणाली, एक सांग , तू स्वामींना मानतेस ना! लताचे होकारार्थी उत्तर होतं म्हटल्यावर मावशी म्हणाली, तू भेटली आहेस का गं त्यांना.. त्यांच्या बद्दल जे जे इतरां करवी ऐकलेस, मंदिरात पाहिलेस, पोथीत वाचलेस त्यावरूनच तुझी श्रध्दा निर्माण झाली ना.. मला एक सांग, मकरंदच्या आईं बद्दल तुमचे नातेवाईक, शेजारी, ओळखीतले लोक काय सांगतात गं?


मावशी, आत्ता पर्यंत एकदाही कोणी काही वाईट बोललेले नाहीये. आता आईंना जाऊन १०-१२ वर्षे झाली असतील पण माझ्या लग्नानंतर जे जे भेटले ते अगदी आजही भरभरून बोलतात आईं बद्दल.. त्या असत्या तर अगदी माझे लाड केले असते असे म्हणतात सगळे. मला वाटतं, 'मरावे परी किर्ती रूपी उरावे', या उक्तीप्रमाणे आहे मकरंदच्या आईचे..


हो ना, बघ हे सगळं तू च सांगितलेस. आणि तरी देखील म्हणतेस मला त्यांच्या बद्दल वाटत नाही.. मला समजतंय बाळा, की हे बोलावं तेवढं सोपं नाही, पण हयात नसणाऱ्या आपल्या माणसांबद्दल, वा पुर्वी काळच्या थोर माणसांची आपण अशीच तर कल्पना चित्र बनवतो ना.. तसेच हे पण..


आणि मुख्य म्हणजे फक्त नवमी निमित्ताने नाही पण अगदी वर्षभर आपले आई वडील , सासू सासरे वा इतर जवळचे लोक, हयात नाही म्हटल्यावर, आपण असेच त्यांना मनोमन पूजावे. आपल्या मुलांना त्यांची ओळख आपणच करून देऊ शकतो.. आठवणींमधूनच तर मुलांना कळणार ना त्यांचे कर्तृत्व...


आता मावशीनं प्रेमाने समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्यानंतर लताच काय तर सगळ्यांनाच हे पटणार होतं.. नाती ही आप्त जनांच्या असताना नि नसताना पण प्रेमाने सांभाळायची असतात.. 


पक्ष पंधरवडा हे तर त्या करताचेच विशेष प्रयोजन असावे, होय ना!! समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now