#नाती_जपताना - कथा ७

8 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा ७

साधना, राघु कुठे आहात?
आरे ताई, तुमी कदी आलता सा?
अगं हो. आम्ही सातारा वरुन निघालो नि तुमचा फोन लागेना मग तसेच परस्पर आलो. ऐक ना , खूप भूक लागली आहे पटकन काहितरी जेवण करतेस का?

साधनाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या चुटकीसरशी तिनं लिलया गायब केल्या... आत्ता करते ताई, बसा तुमी म्हणत ती आत गेली सुध्दा... राघु बागेत जाऊन रसरशीत गोड द्राक्ष व कलिंगड घेऊन आला. हात पाय धुवून आम्ही स्थिरावलो.

आत जाऊन पाहिले तर साधना भाकरीचे पीठ मळत होती व काहीसे गुणगुणत हाताने भरभर कामं करत होती. चुल पेटवुन तयार होती.. अर्ध्या तासात गरमागरम पिठले, ज्वारीची भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा असा साग्रसंगीत मेनू अन्नपूर्णेच्या हातुन तयार होता.. तिच्या हातचं चविष्ट जेवताना खरेच ह्या घरात लक्ष्मी नांदते असेच जाणवत होते...‌

आम्ही येताना दोन मोठ्या पिशव्या भरून जुने कपडे, सुती साड्या, चादरी व शिवणाचे साहित्य ही घेतलं होतं. ते तिला दिले व होतील तेवढ्या मऊसुत गोधड्या शिवायला सांगितले.. व त्याचे ऍडव्हान्सचे सांगुन एक्स्ट्राच्याही नोटा तिच्या हातात कोंबल्या... साधनाचे नको नको चालू होते पण आपण ऐकायचंच नसतं अश्या वेळेस... न बोलताच आम्ही एकमेकांच्या गरजा ओळखून होतो की काय देव जाणे..

निघताना राघुने बागेतील दोन फुलझाडांचे कटिंग, २-५ नारळ, मिरच्या- कढिपत्ता, ताजी भाजी सगळे आधिच गाडीत ठेवले होते... खरंच मनाच्या श्रीमंतीच मोजमाप करता येते का? माणसागणिक नात्याची परिभाषा निराळीच असते... मनोमन या आमच्या अन्नदात्याला भरपूर शुभाशीर्वाद देऊन आम्ही निघालो.. समाप्त!!!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin